Tuesday 10 October 2017

पाऊली चालती मेळघाट ची वाट !!! 

सृजन यात्रा – २०१७

माहित नाही पण मला मेळघाट ने जीवनाचा मेळ कशात आहे याची जाणीव करून दिली तर  घाट सांगून गेला तूला  आयुष्यची खूप वळण बघायची आहेत. माझा सृजन यात्रेच दुसरा अनुभव !!! प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. याची पुन्हा प्रचीती परत आली.

मेळघाट म्हटलं की सगळयांना आठवतो महाराष्ट्रतला वेगवेगळ्या प्रश्नांनी व्यापलेला  प्रदेश जिथे  कुपोषण, बालमृत्यु , वेगवेगळे साथीचे रोग, अंधश्रद्धाळू आदिवासी लोक, शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, बंद  पडलेल्या शाळा, घनदाट जंगल आणि घाटाचा रस्ता. पण माझ्या नजरेतून पाहिलेला मेळघाट थोडा वेगळा होता.


आपल्याकडे नद्या वाहत आहेत पण पाणी प्रदुषित. आपल्याकडे घर आहेत पण त्यात इतरांना प्रवेश नाही. आपल्याकडे पंचतारांकित हॉटेल आहेत पण पौष्टिक आहार नाही. आपल्याकडे आधुनिक वैद्यकीय साधने आहेत पण त्यात गरिबाचे उपचार नाकारले  जातात. आपल्याकडे मुलांना शिक्षण दिले जात पण पाचवीचा मुलाला पहिलीच वाचता येत नाही सांगणारा असर अहवाला निघतो. मग मागास कोण ?? आपण का ते असा प्रश्न मनात येवून जातो.
सृजन यात्राते भेटलेल्या प्रत्येक Role मॉडेल आंम्हाला हेच सांगत होता की इथं आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न आहेत. आम्ही ते सोडवयाला आलो खरे पण याच लोकांनी आम्हाला खूप काही शिकवले.जीव लावणे म्हणजे काय असत हे डॉ. रवींद्र कोल्हे सांगत होते. आदिवासी लोकांनी त्यांना बाधून दिलेलं घर. त्याच्या मुलांची घेतलेली  काळजी, ते M.D करण्यासाठी बैरहगड सोडताना चाळीस किमी अंतर सपूर्ण गाव सोडायला हरिसाल या बस असणाऱ्या गावात पर्यत आला हे सांगताना त्यांना गहिवरून आले.

डॉ. आशिष सातव यांच्या महान ट्रस्ट च्या  कधीही शाळेत न गेलेल्या पण उत्तम वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिलांनी तर आमच्या सगळ्याची मने जिंकून घेतली.व जीवन शिक्षणाचा नवा मंत्र आम्हा यात्रेकरूना आला. चिलाटी सारख्या अतिदुर्गम भागात मेळघाट मित्रच काम सुरु आहे रामभाऊ, मधुभाऊ, चंदूभाऊ जाऊन इथे राहतात व धडक मोहिमेच्या माध्यामातून अनेक युवकांना स्वत:ला ओळखण्याची संधी उपलब्ध करून देतात. बोकोमित्र व आयोग्य मित्र व गावमित्र बनवून आदिवासी कोरकू मित्रांना सक्षम करतात.हे मित्र जेव्हा सरकारी यंत्रणा विरुद्ध बंड पुकारतात तेव्हा खऱ्या चळवळची परिभाषा कळली.

ज्यांना समाज्यान नाकारलं अशा अनाथ मतीमंद मुलांना एकत्रीत  करून एकही कामगार न ठेवता १२३ मुलाचा बाप बनणारा शंकरबाबा पापळकर हे सांगत होते एक समाजसेवा करायची असेल तर पुर्नवसन महत्वाचे आहे.त्यांनी अशा मुला-मुलीची लग्न करून दिली.हे पाहून परत समाजसेवेचा अर्थ नव्याने कळल.

आदिवासी भुकेन मरत नाहीत तर अन्यायने मरतात.यासाठी त्यांना कायदाचे हक्क मिळवून देणारी खोज संस्थेने अजून  एक बाजू आमच्यासमोर ठेवली. समाज सेवाची वेगवेगळी अंगे असतात. जशी गरज आदीवासी भागात आहे. तशी शहरात सुद्धा माणस आहेत व त्यांनाही मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याचे काम डॉ. अविनाश सावजी सर प्रयास सेवांकुर च्या माध्यामातून करत आहे. आणि स्व:ताची नोकरी सरकरी शाळेची नोकरी सोडून फासेपारधी समाजाचा युवक मतीन भोसले याने  ज्यांना समाजाने चोर म्हणून वाळीत टाकल ज्यांना राहयाला घर नाही, खायला अन्न नाही, घालायाला कपडे नाहीत अशा अनेक प्रश्नची उत्तरे शिक्षणाच्या माध्यामातून सोडवण्यासाठी ४४६ मुलामुलांची प्रश्नचिन्ह शाळा याला नक्कीच उत्तर बनेल. असं ती शाळा पाहून वाटते .मेळघाटामध्ये  आम्हला वाघ भेटला नाही पण वाघाच्या तोलामोलाची काम करणारी ढाणे वाघ प्रवृतीची  माणसे नक्की भेटली अस म्हणायला हरकत नक्कीच नाही. 

या प्रत्येक व्यक्तीच्या कामाबद्दल एक स्वतंत्र लेख लिहिता येईल.पण वाचून हा अस्पर्शित भागाचा स्पर्श कळणार नाही.एकदा अवश्य भेट द्या.तुम्ही जरूर म्हणाल पाऊली चालती मेळघाट ची वाट !!!

धन्यवाद !!!
विनायक माळी
विद्योदय मुक्तांगण परिवार, कोल्हापूर